न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय   

डुनेडिन : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी-२० मालिकेतील दुसरा सामना डुनेडिन येथील मैदानावर खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धुतला.पाकिस्तानकडून तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या चेंडूवर सेफर्टने फ्रंटफुटवर येऊन जोरदार षटकार लगावला. त्यानंतर दुसर्‍या चेंडूवरही त्याने याच प्रकारे षटकार मारला. 
 
षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर सेफर्टला कोणताही रन घेता आला नाही. चौथ्या चेंडूवर सेफर्टने दोन धावा पळून काढल्या. त्यानंतर षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर सेफर्टने पुन्हा षटकार लगावले. आफ्रिदी या सामन्यात महागडा गोलंदाज ठरला. त्याने एकाच षटकात २६ धावा दिल्या.संपूर्ण सामन्यात टिम सफर्टने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, टी २० क्रिकेटमधील १० वे अर्धशतक झळकवेल, असे  वाटत असताना तो ४५ धावांवर बाद झाला. त्याने २२ चेंडूमध्ये २०४.५५ स्ट्राईक रेटने ४५ धावा कुटल्या. यावेळी त्याने एकूण ३ चौकार आणि ५ षटकार लगावले. दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज महमद अली याने त्याला बाद केले. 
 
शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, दुसर्‍या टी-२०  सामन्यात त्याने एकूण तीन षटके टाकली. दरम्यान, त्याने ६.७० च्या इकॉनॉमीसह ३१ धावा केल्या. मात्र त्याला काही यश मिळाले नाही. ड्युनेडिनमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात १५ षटकांत नऊ गडी गमावून १३५ धावा केल्या. विरोधी संघाने दिलेले १३६ धावांचे लक्ष्य किवींच्या संघाने १३.१ षटकांत पाच गडी गमावून सहज गाठले. सामन्यादरम्यान सेफर्टने २२ चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले तर फिन ऍलनने १६ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले.
 

Related Articles